Tuesday, June 18, 2024

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers


                     पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय !

डॉ. विधिन कांबळे

माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला माणदेश या नावाने ओळखले जाते. या नदीस माण असे नाव हे त्या नदी प्रदेशात आढळणाऱ्या “माण” या खडकापासून म्हणून या नदी खोऱ्याच्या प्रदेशाला माण या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याचे संस्कृत नाव 'मानवगंगा' असे होते. माण नदी भीमा नदीची उजव्या बाजूने वाहणारी उपनदी असून ती सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई या गावात सीतामाई डोंगररांगेत फलटण तालुक्याच्या दक्षिणेस उगम पावते.   

माण नदी खोऱ्याचा विस्तार विस्तार दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुका, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा उत्तर भाग, जत आणि कवठे-महांकाळ तालुके, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोlला, मंगळवेढा तालुक्याचा पश्चिम भाग व पंढरपूर तालुक्यातील काही गावे यांचा समावेश होतो. माण नदी कुळकजाई ते पंढरपूर तालुक्यातील सरकोली असा एकूण १६० कि.मी. लांब प्रवास करते. नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ४७५७. ४७ चौ .कि.मी. असून  पूर्व -पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी अनुक्रमे ११६.८ व ९१.२ कि. मी. आहे.

माण खोऱ्यात एकूण तीन जिल्हे, सात तालुके व  ३४६  गावांचा समावेश होतो. यामध्ये माण व खटाव तालुक्यातील अनुक्रमे ९९ व ०३, जत, खानापूर, कवठे-महांकाळ व आटपाडी तालुक्यातील (अनुक्रमे २९, ०८, १६ व ६०), गावांचा समावेश होतो. याशिवाय म्हसवड व सांगोला या नागरी वसाहती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, माण नदी खोऱ्याची लोकसंख्या ९०६७७४ आहे, ज्यात ४६३१३६ पुरुष आणि ४४३६३८ महिला आहेत. माण नदी खोऱ्यात ग्रामीण  लोकसंख्येचे प्रमाण ९३.५५ टक्के असून  नागरी लोकसंकख्येचे प्रमाण ६.४४ टक्के आहे. 

बहुतांश भाग अवर्षणप्रवण असल्याने नदीचे पात्र वर्षभर कोरडेच राहते. या नदीवर  ‘म्हसवड धरण’ ज्याला ‘राजेवाडी धरण’ देखील म्हणतात.  हे सातारा जिल्ह्यातील म्हसवड जवळील माण नदीवरील एक धरण आहे. या धरणाची उंची २४  मीटर (७९ फूट) तर लांबी २४७३मीटर (८११४ फूट) आहे. एकूण साठवण क्षमता ४७८८०.८८  किमी  (११४८७.०२ क्यूबीक मीटर) इतकी आहे. माण नदीवर अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.

माणदेश हा कायम दुष्काळी समजला जाणारा महाराष्ट्रातील एक महत्वाचा भाग आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मात करून आधुनिक तंत्राची जोड देत महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील शेतकऱ्यांनाही डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी एक आदर्श घालून दिला आहे. माणदेशाला ऐतिहासिक वारसा लाभला असून असून बानुरगड, शुक्राच्यारी, स्वतंत्रपूर राजेवाडी तलाव, बुधेहाळ तलाव, संत परंपरा असलेले मंगळवेढा, जवळच असलेले पंढरपूर इत्यादी पर्यटन क्षेत्रामुळे माणदेश पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरू पहात आहे.

माणदेशातील अनेक ठिकाणी असलेले  विस्तीर्ण  जलाशय, जैवविविधता संवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे माणदेश हा पक्षीप्रेमीसाठी आकर्षणाचा विषय बनू पहात आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता पक्षीतज्ञ डॉ. निनाद शाह यांच्या मते सोलापूर जिल्हा वगळता माणदेश हा माळढोक पक्षासाठी भविष्यातील  संभाव्य अधिवास ठरू शकतो.

मायणी पक्षी अभयारण्य

मायणी हे पक्षी अभयारण्य विशेषता पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असल्याने विविध पक्षी प्रेमी या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. निसर्गाचे आकर्षित रुप या अभयारण्यात बघायला मिळते. मायणी या गावात ब्रिटिश कालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान असल्याने या ठिकाणाचा ऐतिहासिक निसर्ग संपदेचा परिसर पर्यटकांना आपल्याकडे खेचतो.

मायणी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी या गावात वसलेले आहे, जे सातारा जिल्ह्यापासून 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या गावामधून मिरज- भिगवण आणि पंढरपूर- मल्हारपेठ हे दोन राज्य महामार्ग जातात. मायणी अभयारण्य हे निसर्ग प्रेमींनसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. मायणी गावाजवळ कानकाया नावाच्या एक प्रचंड नाल्या वर बांध घालण्यात आला, आणि यातून इथे एक तलावाचा जन्म झाला होता. या तलावाच्या उगमाने मायणी येथील पाणथळ परिसराचा उगम झाला.

आजूबाजूला असणारे डोंगर आणि जवळ असलेला तलाव यांमुळे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येऊ लागले. त्यामुळे दिवसें दिवस या ठिकाणाच्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली व परिणामी या पक्ष्यांच्या संरक्षणाची गरज भासू लागली. म्हणून ११ मार्च १९८७ रोजी महाराष्ट्र शासनाने मायणी पक्षी अभयारण्याची स्थापना केली.

मायणी अभयारण्याचा परिसर हा सुमारे १०८० एकर एवढा आहे. या ठिकाणाचा निसर्ग आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि पक्षी मित्र येतात.

एके काळी रोहित पक्षी मोठ्या संख्येने जलाषयांवर मोठ्या संख्येने हजेरी लावत असत. देश- विदेशातील अनेक पक्षी  निरीक्षक, आणि पक्षी अभ्यासकाच्या बरोबरच पर्यटकांची पावले  मायणी पक्षी अभयारण्याकडे वळत असत. सद्य स्थितीत जलाशयात मोठ्या प्रमाणावर चिलार वाढल्यामुळे तलावाचे सौंदर्य कमी झाले आहे.  तलाव गाळाने भरल्यामुळे उन्हाळ्यात तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे जलश्यांवरील असलेले पक्षी इतरत्र स्थलांतरित होतात. माणदेशातील या तलावाची स्थानिक व शासकीय पातळीवर दखल घेणे गरजेचे आहे. या इतिहासकालीन तलावाला पुन्हा सौंदर्य प्राप्त करून देण्याची गरज आहे. 

ऐतिहासिक बुधेहाळ  तलाव

१९०२ साली इंग्रजांनी बेलवण नदीवर भव्य असा बांधेलेला बुधेहाळ  तलाव आजही  सुस्थितित आहे.  या तलावाचे वैशिष्ठ्य म्हणजे तलावाचा भराव सांगोला तालुक्यात असून पाणीसाठा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आहे.  हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास मोठ्या धरणासारखा भास होतो. तलावाच्या परिसरात तटबंदी असलेल्या वस्तू आजही सुस्थितीत असून वास्तुकलेचा तो एक सुंदर नमुना आहे. बुधेहाळ तलाव पक्षीप्रेमी मंडळीसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. वर्षानुवर्षे देश विदेशातून येणारे कंठेरी चिखल्या, तुतारी, खंड्या, नदी सुरय, ब्राम्हणी बदक, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, लांडे बदक, चमच्या, चित्र बलाक, पाणकावळा, इत्यादी विविध प्रजातीच्या दुर्मिळ पक्षाबरोबरच विदेशातून येणारे फ्लेमिंगो पक्षी, पर्यटकांना साद घालत असतात.  त्याचबरोबर तलावाच्या परिसरात खाटिक, कोतवाल, पावश्या, निखर, चष्मेवाला, वेडा राघू, ब्राम्हणी घार, ससाणा,चंडोल, शिंपी आदी पक्षी वावरताना दिसून येतात. दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक पक्षी निरीक्षक बुधेहाळ तलावाला आवर्जून भेट देत असतात.

बुधेहाळ तलावापासून जवळच शिवरायांच्या अनेक हिऱ्यांपैकी गुप्तहेर खात्यांचे प्रमुख स्वराज्य रक्षक  बहिर्जी नाईक यांची समाधी बानुरगडावर आहे. इतिहसात हा किल्ला भूपाळगड नावानेही  ओळखला जातो  हे स्थान शिवप्रेमीसाठी स्फूर्तिस्थान आहे. बहिर्जी नाईक यांची समाधी सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगोल्यापासून अगदी जवळ असलेल्या.  बानुरगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड मोठा आहे. एक तलावमहादेव मंदिरसमाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.असे असले तरी पर्यटकांसाठी ते एक स्फूर्तीस्थान आहे. स्वराज्यासाठी बहिर्जी नाईक यांनी दिलेल्या बलिदानाच्या पाउलखुणा आजही बानुरगडावर पहावयास मिळतात.

सांगोला तालुक्याच्या सीमावर्ती भागात माणनदीवर सुमारे १४० वर्षापूर्वी ब्रिटीश राणी व्हिक्टोरियाच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला विस्तीर्ण राजेवाडी तलाव सुद्धा प्रेक्षणीय आहे. याया तलावाचे वैशिष्ठ्य म्हणजे  तलावाचा भाराव  व दारे सांगली जिल्ह्यात असून पाणीसाठा मात्र सातारा जिल्ह्यात आहे. या तलावाच्या परिसरात थोडी पडझड झालेला परंतु वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेला व्हिक्टोरिया राणीसाठी बांधलेला  बंगला पहावयास मिळतो. त्याच बरोबर विविध प्रकारचे देशी विदेशी पक्षी पहाण्याची संधी मिळते.

 वाढेगाव बंधारा- नव्याने उदयास आलेले पक्षी वस्ती स्थान

सांगोला सोलापूर रोडवर सांगोला शहरापासून ५ किमी अंतरावर विलोभनीय असा वाढेगावजवळ  बंधारा आहे. याच ठिकाणी माणगंगा व अप्रुगा या दोन  नद्याचा संगम याच  झाला आहे. संगमावर महादेवाचे सुंदर मंदिर असून इथले इथला परिसर नयनरम्य आहे. मंदिर परिसरातून पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचाही आस्वाद घेता येतो. नाम्या , जांभळी पानकोंबडी, नदी सूर्य, तुरारी, व्हाईट आयबीस, ब्लॅक आयबीस, हळदीकुंकू बदक, टिबुकली, कंठेरी चिखल्या, शेकट्या, जांभळा बगळा, चमचा, आदी पक्षी मनमुराद जलाशयाचा आनंद घेत असतात.

चिंचोली तलाव

सांगोला अकलूज रस्त्यावर अगदी ५ ते ७ किमी वर विस्तीर्ण असा चिंचोली तलाव आहे. हा तलाव सातत्याने भरलेला असतो. मात्र उन्हाळ्यात या तलावाची पातळी खूप खालावते. मात्र शेतीसाठी  कृत्रिम रित्या भरून घेतला जातो. त्यामुळे तलावात मोठ्या संख्येने विहार करीत असल्याचे पहावयास मिळते.

वंचक, शर्ती, नदी सुरय, पाणबुडी बदक, लांडे बदक, टीबुकलीहळदीकुंकू, काळ्या डोक्याचा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, चक्रवाक, कंठेरी चिखल्या, तुतारी, चमच्या, जांभळा बगला, जांभळी पाणकोंबडी, सूरय, पक्षी, आदी पक्ष्याबरोबर रोहित पक्षीसुद्धा कधीमधी जलाशयास भेट देतात.

इतिहासाची साक्ष देणारे शिवकालीन  अंबिका मंदिर आणि तटबंदी

१४ व्या शतकात बांधलेले सांगोल्याचे ग्रामदैवत असलेले  अंबिका माता मंदिर अनेक  कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. सदाशिवभाऊ  पेशव्यांनी १७५० मध्ये  सांगोल्याच्या किल्ल्यावर स्वारी केली. हे युद्ध १५ दिवस चालले व हे  ठाणे त्यांनी ताब्यात घेतले.  याच अंबिका मंदिरात झालेल्या तहानुसार छत्रपती राजाराम यांना नामधारी करून मराठी सत्तेची सर्व सूत्रे पेशव्यांच्या ताब्यात गेली. असे म्हटले जाते की, एकदा छ. शिवाजी महाराज याठिकाणी आले असल्याची खबर मोगलांना मिळाली. त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने मोगल आले परंतु, महाराज आढळून न आल्याने या अंबिका मंदिराची नासधूस केली.  मोगलाईचे घाव  सोसलेल्या भग्न मूर्ती मोगलाईच्या अत्याचाराची जाणीव करून देतात. आज ही सांगोल्याच्या किल्ल्याच्या  तटबंदीची साक्ष देणारी वेस सोलापूर कोल्हापूर महामार्गालगत सांगोल्याच्या इतिहासाची साक्ष देत आहे.

मौजे नाझरे धार्मिक व आध्यात्मिक स्थळ:

सोलापूर - कोल्हापूर रोडवर सांगोल्यापासून १०ते १२ किलोमीटर वर ३०० वर्षांची संत परंपरा असलेले नाझरे गावासाठी रस्ता फुटतो. याच गावातील अनेक संतापैकी एक असलेले चौदा हजार ओव्यांचा ग्रंथ  लिहिणारे संत श्रीधरस्वामी होऊन गेले. या गावात अनेक संतानी समाधी घेतली असल्याचे सांगितले जाते. हे आध्यत्मिक ठिकाण पहाण्यासारखे आहे.

स्वतंत्रपूर

सांगोल्या पासून ३० ते ३५ किमीवर आटपाडी तालुक्यात स्वतंत्रपूर अर्थात कैद्यांची खुली वसाहत असून आशिया खंडातील वैशिष्ठ्यपूर्ण असलेली कैद्याची वसाहत आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने १९३९ मध्ये उभारलेले जन्मठेपेची शिक्षा भोगणारे अनेक बंदी मुक्त वावरत असतात. ऐ मालिक तेरे बंदे हमहे भावपूर्ण गीत असलेला व व्यंकटेश माडगुळकर लिखित दो आंखे बारा हात हा चित्रपट स्वतंत्रपूर वर आधारित आहे. पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे.

पंढरपूर

पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील विठ्ठल आणि रुक्मिणीचे प्रसिद्ध मंदिर हे भक्त पुंडलिकाच्या कथेशी संबंधित आहे. भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे राहण्यास सांगितले आणि त्यांच्या आई-वडिलांची सेवा केली. या कथेमुळे पंढरपूरला भक्तीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. पंढरपूरची संत परंपरा अत्यंत समृद्ध आहे आणि येथे अनेक संतांचे वास्तव्य होते. संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ,  संत बहिणाबाई यांच्यासारख्या अनेक संतांनी येथे भजन आणि कीर्तन केले आहे. या तीर्थक्षेत्राचे वर्णन अनेक संतांच्या अभंगात आणि कीर्तनात आढळते, आणि त्यांच्या अभंगातून पंढरपूरच्या आध्यात्मिक महत्त्वाचे दर्शन घडते. पंढरपूरच्या ऐतिहासिक महत्त्वाचे एक मुख्य भाग म्हणजे वारकरी संप्रदाय. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठ्या प्रमाणात वारकरी येतात आणि भव्य यात्रा भरते. या यात्रेत संत तुकारामांच्या अभंगांचे गायन, भजन, कीर्तन आणि धार्मिक उपासना केली जाते. पंढरपूरच्या इतिहासात आणि संत परंपरेत रुची असणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक आदर्श स्थान आहे.

 

 

 

 

 

 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...