जांभळा
सूर्यपक्षी / शिंजीर
इंग्रजी नाव: Purple Sunbird
शास्त्रीय
नाव: Cinnyris asiaticus)
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)
चिमणीपेक्षा
आकाराने लहान असलेला, फुलातील मकरंद पिण्यासाठी पंखांची फडफड करत हवेत उडणारा
आपल्या घराच्या बागेत नेहमी दिसणारा देखणा चिमुकला पक्षी म्हणजेच जांभळा
सूर्यपक्षी अथवा शिंजीर होय. याचा उन्हात चमकणारा काळा रंग आपले लक्ष्य वेधून
घेतो. पळस, काटेसावर व पांगारा वसंत ऋतूत बहरात आल्यानंतर हे पक्षी फुलातील मधाचा
आस्वाद घेण्यासाठी प्रथम हजेरी लावतात. पानगळीचे जंगल, शेतीचा प्रदेश, माळराने, बागा इ. ठिकाणी हा पक्षी हमखास दिसून येतो.
जास्वंदीच्या फुलाच्या दांडीवर उलटे लटकून मध खाताना अनेकांनी पहिला असेल. फुलांचा
अचूक वेध घेत मध चाखण्यासाठी इकडे-तिकडे उड्या मारत झीट किंवा स्वीई असा आवाज
करतात बागेत बागडणारा पक्षी आपले लक्ष्य वेधून घेत असतो.
सूर्यपक्षाच्या सुमारे ९५ जाती असून बहुतेक जातींतील नराचे रंग भडक व
आकर्षक असतात.
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा जांभळा
सूर्यपक्षी ‘फूलचुखी’ या नावानेदेखील ओळखला जातो. हा अंदाजे १० सें.मी. लांब असून विणेच्या
हंगामात नर चमकदार निळ्या-जांभळ्या रंगाचा असतो. याच्या पिसाच्या वरच्या भागात
शेंदरी रंगाचा एक छोटा पट्टा देखील दिसतो. इतर काळात नर-मादी दिसायला सारखेच
असतात. वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, छातीवर काळा पट्टा. फुलातील मध खाण्यासाठी
याची चोच शरीराच्या मानाने लांब
व बाकदार असून याची जीभही लांब असते. सूर्यपक्षाची जीभ
लांब व बारीक नळीसारखी असल्यामुळे सर्व प्रकारच्या फुलातील मध चाखणे त्याला शक्य
होते.
जर फूल फार
मोठे असले तर फुलातील मधाच्या पेल्याच्या थोडे वर चोचीने भोक पाडून त्यातून तो मध
चोखून लागतो. फुलांवर असलेले कीटक व कोळी देखील तो खातो. कधी-कधी तो कोळ्याच्या
शोधात घरातसुद्धा शिरताना दिसून येतो.
विणीचा हंगाम साधारणपणे मार्च ते मे हा असतो, शिंजीराचे घरटे लांबट थैलीसारखे किंवा चेंडूसारखे असते.एखाद्या घरटे एखाद्या
वेलीला किंवा झुडूपाला टांगलेले असते. कधी-कधी घराच्या आसपास लटकणाऱ्या तारेला अथवा
दोरीच्या आधाराने बनवलेले पहावयास मिळते. घरटे हे गवत, कापूस, कोळ्याचे जाळे, लाकडाचे
छोटे तुकडे इत्यादीपासून बनलेले असते. मादी एकटीच घरटे बांधण्याचे काम करते. नर
मात्र आपल्या चमकणाऱ्या पंखाचा रुबाब दाखवत फुलातील मध चाखत असतो.
मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते; ही अंडी राखाडी-हिरवट रंगाची व
त्यावर तपकिरी ठिपके असतात. मादी अंडी
उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात
No comments:
Post a Comment