चश्मेवाला
इंग्रजी नाव: Oriental White Eye
शास्त्रीय नाव: Zosterops palpebrosus
चस्मेवाला फळे खाताना
चस्मेवाला पक्षाचे घरटे
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)
आपल्या घराच्या बागेत किंवा फळबागमध्ये आढळणाऱ्या छोट्या
छोट्या पक्ष्यामधला छोटासा पक्षी म्हणजे चश्मेवाला. तो आपल्याला सहज नजरेस पडत
नाही. हा पक्षी मिश्रहारी असला तरी बागेतील फळांवर एकत्र बसून ताव मारताना नक्की
दिसून येतात. त्याच्या डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ अगदी चश्मा घातल्या सारखे वाटते म्हमून याला
चश्मेवाला हे साजेसे नाव दिले आहे. हे पक्षी नेहमी घोळक्याने राहणे पसंत करतात.
चश्मेवाला झाडाच्या फांदीवर बसताना एकमेकाला खेटून बसतात ते पहावयास खूप सुंदर
वाटते, ते एकमेकाची पिसे चोचीने विंचरत असतात, याला
गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू असेही संबोधले जाते.
चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो.
संपूर्ण आशिया खंडातील देशात आढळणारा पक्षी असून चीन, अफगाणिस्तान,श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, निकोबार, मलेशिया
इ देशांत याचे वास्तव्य आहे. तसेच आफ्रिका व ऑस्ट्रेलिया मध्ये याच्या प्रजाती
आढळतात.
हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी असून साधारण १०
ते १५ सें.मी. आकारमान असतो. शेपटीचा आकार थोडाफार चौकोनी असून खालच्या
बाजूला हिरवट-पिवळा तसेच डोके ओ वरचा भाग
गर्द पिवळ्या रंगाचा असतो. याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ
असते त्यावरून याचे नाव चश्मेवाला असे पडले असावे. लहान थव्यात झाडांवर राहणारा
अत्यंत उत्साही व चपळ पक्षी आहे. कीटक आणि
मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. त्याचबरोबर सीताफळ, वड, पिंपळ
इ, झाडांची फळेही आवडीने खातो. त्याच्या हिरवट, पिवळसर
रंगामुळे दाट झाडा-झुडपात सहजी आपल्याला दृष्टीस पडत नाही.
विणीचा हंगाम साधारणपणे एप्रिल ते जुलै हा असून जमिनीपासून
२ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळे, केस इ गोष्टींचा वापर करून तयार केलेले असते.
लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची असून टोकाकडे टोपीच्या आकाराची गडद
निळी असतात. अंड्यांचा उबवण कालावधी ११ ते १२ दिवसाचा असतो. नर-मादी मिळून पिलांना
खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. १२ ते १३ दिवसात पिले घरटे सोडून
स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होतात.
No comments:
Post a Comment