Thursday, October 10, 2019

साळुंकी पक्षी : Indian mayna (Acridotheres tristis)

साळुंकी पक्षी 
इंग्रजी नाव : Indian mayna  
शास्त्रीय नाव : Acridotheres tristis
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

 
साळूंकी पक्षाला मैना, किंवा साळू म्हणूनही महाराष्ट्रात ओळखले जाते. संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगात साळुंकी पक्ष्याचे वर्णन आढळून येते. तिच्या आवाजाला मंजुळ म्हणतात. त्या अभंगातील एक कडवं इथे देत आहे.
आपुलिया बळे नाही मी बोलत ।
सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥धृ॥
राघू-मैनेच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. हिंदी सिनेमात तोता-मैना की कहाणी तो पुराणी हो गई. हे गाणे कितीतरी वेळा रेडीओवर ऐकले असलेल. आपल्याला माहित आहेच की, राघू अर्थात पोपट मिठू-मिठू बोलतो. पण त्याच्या तोडीस तोड मैना अर्थात साळुंकी हा पक्षी आहे हे सिध्द होते. कारण मैना विविध आवाज करण्यात तरबेज असते.
आशिया खंडातील भारत, श्रीलंका, नेपाल, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान, ब्र्हमदेश आदि देशात आढळणारा हा पक्षी साधारण कबूतराच्या आकाराचा हा पक्षी आपल्या मनुष्य वस्तीच्या जवळ दिवसभर वावरतात. ते घराच्या आसपास वावरताना नेहमीच पहावयास मिळतो. हे पक्षी थव्याने राहणारे असून मोठ-मोठ्याने कलकलाट करतात.  बहुतांशीवेळा साप अथवा मांजर त्यांच्या दृष्टीस पडल्यानंतर कलकलाट करतात व त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात किंवा टोचून- टोचून हैराण करतात. रात्रीच्या निवाऱ्यासाठी मोठ-मोठ्या झाडांवर शेकडोच्या संख्येने जमा होतात. मात्र सूर्योदयापूर्वी मोठ-मोठ्याने आवाज करत थव्याने झाड सोडतात व अनेक टोळ्यात विभागतात.   साळुंकी, ब्राहाम्नी मैना आणि गुलाबी मैना (भोरडी) हे पक्षी एकत्रपणे संचार करतात. गुलाबी मैना हा पक्षी स्थलांतरित असून ज्या भागात त्या प्रथम प्रवेश करतात त्या भागातील साळुंकी पक्ष्यांच्या थव्यामध्ये मिसळून एकत्रित फिरतात. कदाचित भोरडा पक्षी मैनेचा वापर गाईड/ मार्गदर्शक म्हणून करत असावा, असे माझ्या निरीक्षणातून आढळून आले आहे.
साळुंकी पक्ष्याचा पाठीवर गडद तपकिरी असतो.साळून्कीची मान, डोके व तोंडावळा काळा असतो. चोच चकचकीत पिवळी असून पाय पिवळे असतात. त्यांच्या पंखात असलेली पांढरी पिसे पंख मिटलेल्या अवस्थेत फारशी दिसत नसली तरी उडताना पांढरे पट्टे स्पष्ट दिसतात. पोटाकडचा भाग क्वचित पांढरा असतो. निवांत क्षणी झाडावर बसल्यावर साळुंकी वेगवेगळे आवाज करते. त्याच्या आवाजाने  आपले लक्ष सहजपणे वेधून घेते. साळुंकी इतके विविध आवाज करणारा व इतर पक्षी, प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करणारा ब्राम्हणी मैनेशिवाय दुसरा पक्षी आपल्या परिसरात आढळणार नाही. संत तुकाराम महाराजांना साळुंकीच्या आवाजाची भुरळ पडलेली दिसते.  त्यांच्या प्रत्येक कडव्यात साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । असा उल्लेख करून तिच्या मंजुळ आवाजाचे गुणगान करताना आढळते. अत्यंत मार्मिक अभंगातील आशय समजणे अत्यंत कठीण आहे. 
साळुंकी हा मिश्राहारी पक्षी असून कीटक हे त्याचे मुख्य अन्न आहे. शेतात अथवा कुरणात चरणाऱ्या जनावरांच्या आसपास वावरतान साळुंकी हा पक्षी आढळतो. जनावरे चरताना गवतातील किडे चाळवले जातात. असे किडे साळूकी भक्ष्य बनतात. तसेच गाई-गुरांच्या अंगावर बसून गोचिडा टिपतात. फळे, उकिरडयावरचे खरकटेही खाताना आढळून येतात. किंवा जे  मिळेल ते खाऊन आपली  भूक भागवतात
साळून्कीचे घरटे इमारती, घरांचे छप्पर, किंवा झाडांना असणाऱ्या खबदाडीतकाडया, कागद, चिंध्यापासून करत्तात. मादी ४ ते ६ निळसर हिरवट अंडी घालते. १७ ते १८ दिवस अंडी उबव्ल्यानंतर पिल्लू अंड्यातून बाहेर येते. साधारणतः महिन्याभरातच पिल्ले घरटे सोडून स्वतंत्रपणे समर्थ होतात.

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...