कोतवाल इंग्रजी नाव : Black Drongo,
King Crow)
शास्त्रीय
नाव: Dicrurus
macrocercus
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)
कोतवाल
भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी असून आशिया खंडातील बहुतेक देशामध्ये आढळणारा हा
पक्षी ईराणसह, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका,
चीन, इंडोनेशिया या देशांमध्येही याचे
वास्तव्य आहे. तसेच आफ्रिका व ओस्ट्रेलियाखंडामध्येही याचा वावर आढळून येतो.
कोतवाल
हा पक्षी अतिशय चपळ,
तापट व भांडखोर स्वभावाचा पक्षी आहे. या पक्ष्याचा ‘दि अँग्री यंग बर्ड’ असाच उल्लेख केला पाहिजे. कारण
हिंस्र पक्ष्यांपासून आपल्या घरट्याचे व पिलांचे रक्षण करतो. कावला, घर, ससाणा एवढाच नव्हे तर गरुड किंवा गिधाड सारख्या
पक्ष्यांशी तो दोन हात करण्यास सज्ज असतो. कावळ्याचा पाठलाग करताना अनेकवेळा आपण
पहिले असेल. टोचा मारून कावळ्याला हैराण करतो व आपल्या पिल्लांचे रक्षण करतो.
मात्र गरीब व दुबळ्या पक्ष्यांना तो तो अजिबात त्रास देत नाही. त्यामुळेच असे
पक्षी कोतवाल पक्ष्याच्या शेजारी घरटे बांधतात. जेणेकरून कोतवालमुळे त्यांच्याही
घरटय़ांचं रक्षण व्हावं. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.
हे
पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी
प्रदेशात राहणे पसंत करतात. कोतवाल हा
आकाराने बुलबुलपेक्षा मोठा असतो. संपूर्ण काळ्या रंगाचा सडपातळ असणाऱ्या या
पक्ष्याची त्याच्या शेपटीसह शरीराची लांबी १८ ते ३१ सेंमी. असते. नर-मादी दिसायला सारखेच असले तरी नराच्या
तुलनेत मादीचा रंग कमी तकतकीत असतो. शेपटी लांब असून दुभागलेली असते. तसेच हे दोन
भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात. चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका
दिसतो. डोळ्यांचा रंग तांबडा असतो.
कोतवाल
हा पक्षी कीटक खाऊन आपली गुजराण करीत असतो. उंच ठिकाणी बसून भक्ष्यावर पाळत ठेवतो.
हवेतील किंवा जमिनीवरचा कीटक दिसला की, त्याला पकडून तो
आपल्या जागेवर येऊन बसतो व कीटकांचे तुकडे तोडून खाऊन टाकतो. चरणार्या गुरांच्या
पाठीवर बसूनही तो कीटक टिपताना अनेकवेळा आपणास पहावयास मिळतो. गुरांच्या
हालचालीमुळे कीटक उडू लागतात व कोतवालचे भक्ष्य बनतात.
कोतवाल
पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः एप्रिलपासून ऑगस्टपर्य़ंत असतो. एखाद्या उघड्या
जागेवरील एकटे दुकटे उंच झाड निवडून त्याच्या खूप उंचीवरील फांदीच्या टोकाकडील
दुबेळक्यात नर-मादी मिळून वाटीच्या आकाराचे घरटे बांधतो. कोळिष्टकाने चिकटविलेल्या
बारीक काटक्या व धाग्याचे ते बनविलेले असते. मादी एका वेळेला पांढर्या अथवा
फिक्कट गुलाबी रंगाची व लालसर ठिपके असलेली २ ते ५ अंडी घालते. २ आठवयापर्यंत अंडी
उबवल्यानंतर अंड्यातून पिले बाहेर पडतात. अंडी उबविणे आणि पिलांना खाऊ घालणे ही
कामे नर व मादी मिळून करतात.
No comments:
Post a Comment