Monday, June 10, 2024

बगळा / बलाक / सारंग Heron

 बगळा / बलाक / सारंग  Heron


माणदेश हा दुष्काळी भाग असला तरीही माणदेशात विविध प्रकारचे बगळे सर्वच जलाशयावर आढळतात. बगळा पक्षी त्याच्या पांढऱ्या रंगामुळे सर्व परिचित आहे. बहुतांश लोक जलाशयांवर दिसणाऱ्या पांढऱ्या दिसणाऱ्या करकोचे, आणि पांढऱ्या दिसणाऱ्या पक्ष्यांना बगळे म्हणूनच संबोधताना  दिसतात.  भारतात सर्वत्र आढळणाऱ्या बगळ्यांच्या जगभरात जवळपास ६० ते ६५ प्रजाती आहेत. ते विविध रंगाचे आणि आकाराचे असतात. सर्वच बगळे दलदली भागात, तलाव, नाले, आणि उथळ पाण्याच्या ठिकाणी सहजपणे वावरताना दिसतात. बाकदार मान, लांब चोच, लांब पाय व तासनतास एका जागेवर पाण्यात उभे राहून शिकार अर्थात मासे टप्प्यात आल्यानंतर अत्यंत चपळाईने मासे पकडतात. तसं पहिले तर बगळे सर्वाहरी असून त्यांच्या आहारात कीटक, पानकोळी, किडे, बेडूक, शंख- शिंपले, छोटे प्राणी ही ते खातात. आकारानुसार व रंगानुसार बगळ्याचे काही प्रकार माणदेशातील बहुतांश जलशयावर आढळतात.  छोटा बगळा, मध्यम बगळा, मोठा बगळा, राखी बगळा, निळा बगळा, जांभळा बगळा, इ प्रकार आढळतात.




छोटा बगळा

इंग्रजी नाव : little egret

शास्त्रीय नाव - Egretta garzetta

हा आकाराने छोटा बगळा असून याला लहान बगळा किंवा मोरबगळा ही म्हणतात. हा बगळा पांढरा शुभ्र असून चोच पूर्णतः काळी असते. पाय लांब असून काळ्या रंगाचे असतात. विणीच्या हंगामात नर बगळ्याच्या मानेजवळ एक सुंदर तुरा येतो.

मोठा बगळा

इंग्रजी नाव : Greater egret

शास्त्रीय नाव : Ardea alba

मोठा बगळा हा एक मोठा, पांढरा शुभ्र बगळा आहे.  यांची चोच पिवळी असून पाय मात्र काळ्या रंगाचे असतात. चोच लांब, सडपातळ आणि टोकदार असते. प्रजनन हंगाम हा विशेषतः वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात असतो. हे हंगाम स्थानिक हवामान आणि अधिवासानुसार वेगवेगळा असू शकतो. विणीच्या हंगामात मोठ्या बगळ्यांच्या शरीरावर लांब, फिकट पिंगट पिसे येतात, ज्यांना "एग्रेस" म्हणतात.  नर बगळे माद्यांना आकर्षित करण्यासाठी पिसे फुलवतात आणि विविध प्रदर्शन करतात. यात उंच उभे राहणे, मानेच्या हालचाली, आणि पंखांचे प्रदर्शन यांचा समावेश होतो. एवढेच नव्हे तर नर बगळे प्रजनन हंगामात वेगवेगळ्या आवाजांच्या मदतीने माद्यांचे लक्ष वेधून घेतात. जलाशयाच्या काठावर असलेल्या झाडावर समूहाने घरटी बनवतात. नर मादी मिळून गवत काड्याचा व पानाचा वापर करून घरटी बनवतात. मादी ३ ते ४ निसलर पांढऱ्या रंगाची आनदी घालाटे. नर –मादी मिळून पिल्लांचे संगोपन करता.

राखी बगळा

इंग्रजी नाव : Grey heron

शास्त्रीय नाव: Ardea cinerea

रंगानुसार याला ‘राखी बगळा’ हे नाव देण्यात आले आहे. मात्र पोटाकडची बाजू धुरकट पांढरी असते. डोके व मान  पांढरी असते. मान बाकदार व लांब असते. चोच पिवळ्या रंगाची असून मजबूत आणि टोकदार असते. मादीच्या डोक्यावर तुरा असून छातीवरील काळे पांढरे पिसे भुरकट असतात.  राखी बगळ्यांची घरटी जलाशयाच्या काठावर असलेल्या झाडांवर पसरट मचाणासारखी घरटी बनवतात. या घरट्यात मादी ३ ते ५  गडद निळसर हिरव्या रंगाची अंडी घालते.

जांभळा बगळा

इंग्रजी नाव : Purple heron

शास्त्रीय नाव : Egretta garzetta

जांभळा बगळा हा सुंदर आणि आकर्षक रंगाचा शांत बगळा आहे.  तो हवेत उडताना अत्यंत आकर्षक दिसतो. हवेत उडताना आपली बाकदार मान मागे खेचून आणि पाय मागे ओढून संथ गतीन उडताना लक्ष वेधून घेतो. रंगाने हा पक्षी तांबूस जांभळा रंग असून पायावरील पिसांचा रंग जांभळा  असतो. पाय लांब व  काळ्या रंगाचे असतात.  जांभळा बगळा हा सुंदर आणि महत्वपूर्ण पक्षी आहे जो आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याचे प्रतीक आहे.  हा पक्षी जलाशयाच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी एक चांगला पर्यावरणीय सूचक आहे. त्याच्या संख्येत अचानक घट झाल्यास जलाशयाच्या प्रदूषणाचे संकेत मिळू शकतात. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, व माणदेशात हा पक्षी विविध जलाशयांमध्ये, तलावांमध्ये आणि नद्या- नाले यांच्या किनाऱ्यांवर आढळतो. जांभळा बगळा सामान्यतः झाडांच्या फांद्यांवर, झुडुपांमध्ये किंवा गवताच्या दाटीमध्ये आपले घरटे बनवतो. त्याचे घरटे साधारणतः काटक्या, गवत आणि पाने यांच्या सहाय्याने बनवलेले असते.  मादी साधारणतः ३ ते ५  निळसर पांढरी अंडी घालते. मादी आणि नर दोघेही अंडी उबवतात आणि पिलांची काळजी घेतात. अंडी उबवण्यासाठी साधारणतः २१ ते २५ दिवस लागतात. पिले साधारणतः४० ते ४५ दिवसांमध्ये उडण्यासाठी तयार होतात.

गाय बगळा

इंग्रजी नाव : Cattle egret

शास्त्रीय नाव : Bubulcus ibis

हा आकाराने लहान, अनुकूलनक्षम पक्षी आहे जो चरणाऱ्या प्राण्यांशी सहजीवी संबंधासाठी ओळखला जातो. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील काही भागातून उगम पावलेले हे पक्षी जगभरातील विविध प्रदेशांमध्ये यशस्वीरित्या विस्तारले आहेत, ज्यामध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. गाय बगळे हे तुलनेने लहान बगळे आहेत, लांबी ४५ ते ५५ सेमी आणि पंखांचा लांबी ८८ ते ९६  सेमी आहे. प्रजनन हंगामात, त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर फिकट पिंगट रंगाची पिसे येतात, आणि त्यांच्या चोच आणि पाय लालसर होतात. इतर वेळी ते मुख्यतः पिवळ्या चोच आणि पायांसह पांढरे असतात.

गायबगाळयांची घरटी पाण्याजवळील झाडे किंवा झुडुपांमध्ये बांधलेले असतात. मादी  ३ ते ५ फिकट निळ्या अंडी घालतात, दोन्ही पालक अंडी ऊबविण्याचे आणि पिल्लाचे संगोपन व संरक्षण करतात. 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...