वेडा राघू / बहिरा/किवंडा राघू
इंग्रजी नाव: Green Bee-eater
शास्त्रीय नाव:Merops orientalis
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)
आशिया व आफ्रिका खंडात आढळणारा हा पक्षी भारतात सर्वत्र सर्व ऋतूत समूहाने आढळणारा स्थानिक पक्षी आहे. उष्ण कटीबंधातील बहुतेक सर्व देशात याचे वास्तव्य आहे. हा किडे खाणारा पक्षी असून कधी-कधी फळे सुधा खातो. संध्याकाळच्या वेळी हे पक्षी मोठ्या थव्याने वीजेच्या तारांवर ओळीने बसलेले आढळतात. अशा बसलेल्या थव्याकडे दगड भिरकावला तर हा पक्षी त्या दगडाकडे टकमक पाहात राहतो. म्हणून याला वेडा/बहिरा/किवंडा राघू या नावानेसुद्धा ओळखतात. वाळूवर अथवा मातीत लोळणे ह्याला आवडते. शेताजवळ ,माळरान अथवा जंगल झाडीत राहणारा हा पक्षी आहे. अर्थात पाणथळ भागात सुद्धा दिसतो पण ती त्याची वास्तव्याची जागा नसते.
इंग्रजी नावाप्रमाणे (Green bee-eater ) हा हिरव्या रंगाचा पक्षी मधमाश्या किंवा हवेत उडणारे अनेक कीटक हेवेतल्या हवेत टिपतो. त्याची शिकार करण्याची पद्धत अत्यंत बघण्यासारखी असते. हवेतल्या हवेत अत्यंत वेगाने दिशा बदलण्यात तरबेज असतो. त्याने हेरलेला, हवेत उडणारा कीटक दिसताच त्या किड्याच्या पाठी लागल्यावर त्याच्या हवेत चाललेल्या कसरती वेड्या वाकड्या असतात. तो हवेत सरळ उडण्यापेक्ष्या वेड्या सारख्या कोलांट्या मारत असतो. आणि म्हणूनच त्याचं नाव "वेडा राघू " असं पडलं असावं.
वेडा राघू हा लहानसा पक्षी साधारण १६ ते १८ सें मि लांब असतो पण त्यात त्याची लांब काळी शेपटीच साधारण ५ सें मि असते . हिरवा रंग, काळी चोच, लांब काळी शेपटी, आणि खाटिक पक्ष्याप्रमाणे डोळ्यावर काळी पट्टी, पोट आणि गळा पोपटी अथवा निळसर पोपटी असतो, डोक्यावर सोनेरी पिवळा रंग. असा हा लहानसा पक्षी खरच सुंदर दिसतो. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. ह्यांच्यातील फरक सांगणे कठीणच असतं.
वेडा राघूची जोडी आयुष्यभर एकमेकाला साथ देत असते. वेडा राघूचा
विणीचा हंगाम हा मार्च ते जून असा आहे.या पक्षाचे घरटे म्हणजे जमिनीत खोल बोगदा
केलेला असतो. नदी किनारी किंवा वाळूच्या
ढीगामध्ये हा बोगदा ५ फुटापर्यंत लांब असू शकतो. मादी ३ ते ५ अंडी घालते. अंडी
घरट्याच्या शेवटी जमिनीवरच घातली जातात. अंडी गोलाकार असून चमकदार पांढरी
असतात. नर-मादी मिळून अंडी उबवण्याचे काम
करतात. १४ ते १५ दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर पडतात. ३ ते ४ आठवड्यात पिलांची
वाढ पूर्ण होते व ती स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होतात.
No comments:
Post a Comment