Tuesday, June 18, 2019

सुगरण / बया पक्षी Weaver Bird, Baya bird शास्त्रीय नाव : Ploceus philippinus


सुगरण / बया पक्षी   
इंग्रजी नाव : Weaver Bird, Baya bird 
 शास्त्रीय नाव : Ploceus philippinus
Dr. Vidhin Kamble 
डॉ. विधिन कांबळे

 
अरे खोप्यामधी खोपा,
सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी
तिने झोका झाडाले टांगला!
वरील कवितांच्या या ओळी बहिणाबाई यांनी सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे वर्णन करणाऱ्या सुंदर कवितेतील आहेत. हे आपल्याला माहित आहेच. अत्यंत सुंदर, बारकाईने आणि काळजीने घरटे बनवणारा हा पक्षी म्हणजे सुगरण. सुगरण हा पक्षी  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.     पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण  वगैरे. पण या सर्वांत बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे.  सुगरण पक्ष्यांचे थवे कापणी झालेल्या शेतात आणि शेतीभोवतालच्या प्रदेशांत नेहमी आढळतात. तसेच तलावांच्या काठावरील झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत हे रात्री विश्रांती घेतात. लहान किडे, धान्य, फ़ळं नी गवतांच्या बियांच्या जोडीला कधीमधी फ़ुलपाखरं, बेडकाची लहान पिल्लं, लहानसहान पालीपण खातात. पावसाळा सुरू झाला की बया नराचा नूर पालटून जातो. एखाद्या नवरोबासारखा अंगावर हळद लावावी त्याप्रमाणे त्यांचं डोकं आणि गळयाखालचा भाग पिवळा होतो. नर व मादी या दोघांचाही रंग पिंगट-तपकिरी असून पंख आणि शेपटी गडद तपकिरी रंगाची; खालचा भाग पिंगट; चोच जाड व निमुळती असते. उन्हाळ्यात नराच्या डोक्याच्या दोन्ही बाजू , हनुवटी व गळा काळसर-तपकिरी रंगाचा आणि छाती व डोक्याचा उरलेला भाग चकचकीत पिवळा होतो. मात्र विणीचा हंगाम सरल्यावर नर-मादीचा रंग अगदी चिमणी सारखा होतो. 
मे ते सप्टेंबर हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. गवताच्या लांब लांब काडया चोचीने खुडून झाडावरती पक्की जागा हेरून तो घरटं बांधायला सुरवात करतो. नारळाच्या पानाचेच सोपट वापरलेलं जाते. चोचीने गवताची काडी खालीवर गुंफत तो हे काम करतो. खालच्या बाजूला ते घरटं पुंगीसारखा गोल आकार धारण करतं. गोल फुगवटयाची जागा अंडी ठेवण्यासाठी त्या बाजूला कापूस किंवा मऊ पदार्थ ठेवला जातो. वा-याने घरटं हलू नये म्हणून आत मातीचे गोळे ठेवून ते जड केलं जातं. असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी झाडाला टांगलेले असते. कधी-कधी बाभळीच्या झाडावर अगदी उंच फांदीच्या टोकाला कधी ३० ते ४० घरटी आपणाला पहावयास मिळतात. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो. सुगरण पक्ष्याच्या मादीला घरटे निवडण्याचा अर्थात वर निवडण्याचा अधिकार दिला आहे. नराने बांधलेलं घर आर्किटेक्टनं तपासावं तशी ती पहाणी करते. घरटे आकर्षक व सुरक्षित वाटले तर नर मादीचं मीलन होतं मग यापुढची सारी कामे म्हणजे अंडी घालणं ती उबवणं ही कामं मादीला करावी लागतात. एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलाविण्यासाठी परत गाणी म्हणतो. नर सुगरण एकावेळी एकपेक्षा जास्त मादींचा "दादला" असतो. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो.
विणीच्या हंगामात मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते.

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...