तांबट
इंग्रजी नाव Coppersmith
Barbet
शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica)
तांबट पक्ष्याचे वास्तव्य भारतीय उपखंड व दक्षिण-पूर्व आशियातील
काही भागांत आढळतो. हा येथील कायमचा रहिवाशी आहे. शेतात व बागेतील वृक्षांवर तसेच
विरळ झाडीच्या प्रदेशातही तो आढळतो. हिमालयात हा पक्षी तीन हजार फुटांपर्यंत
आढळतो. शुष्क वाळंवटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. हा
भारतात सर्वत्र आढळतो. अर्थात हा अगदी सहज नजरेत येत नाही कारण ह्याच्या रंगामुळे
हा हिरव्या झाडांमध्ये सहज दडून बसतो. हा पक्षी दिसण्याचे प्रमुख कारण म्हणजे
ह्याची ओरडण्याची पद्धत. तांब्याच्या भांड्यावर घाव घातल्यावर येणाऱ्या आवाज सारखा
आवाज करून आपले लक्ष वेधून घेतो या हिरव्या पक्ष्याच्या गळयाजवळ व कपाळावर लाल ठिपका असतो. गळा पिवळा व पोटाखालचा भाग
हिरवट पिवळसर असतो. चोच चिमणीच्या चोचीपेक्षा जाड असते. त्याच्या नाकाजवळ आणि
चोचीच्या बुडाजवळ तुरळक जाड केस मिशांसारखे डोकावत असतात. फ्रेंच भाषेत दाढीला
बार्बेट म्हणतात व त्यावरूनच त्याला इंग्रजी भाषेत 'बार्बेट'
हे नाव मिळाले आहे. त्याला कॉपरस्मिथ असेही म्हणतात. त्याचं सरळ
भाषांतर ताबंट असे होतं. ताबंट लोक हातोडयाने पत्रा ठोकताना जसा आवाज होतो तशा
आवाजात हा पक्षी आवाज करायला लागतात. दक्षिण भारतात तांबट पक्ष्याचे चार प्रकार
दिसून येतात. तपकिरी डोक्याच्या तांबट (Brown headed barbet) या
पक्ष्याचे डोके, छाती, कंठ तपकिरी
रंगाचे असतात. पांढऱ्या गालाच्या तांबट पक्ष्याच्या (White-cheekeel
barbet) डोळ्यांची वरची कडा आणि गाल हे पांढऱ्या रंगाचे असतात.
किरमिजी रंगाच्या तांबट पक्ष्याच्या (Crimson fronted barbet) गळ्यावर व छातीवर किरमिजी रंग असतो व त्यामागे अनुक्रमे काळा आणि निळा
पट्टा असतो. वसंत ऋतूत त्याची लगबग आणि प्रियाराधन चालू असतं म्हणूनच हिंदी भाषेत
त्याला 'छोटा बसंत' म्हणतात.
मृत झाडांवर वा झाडांच्या मृत
खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. सुतारपक्ष्याप्रमाणेच
ताबंटही झाडाला रूपयाएवढे भोक पाडून घरटं तयार करतो. झाडावर 'टॉक-टॉक' असा आवाज आल्यास समजावे की, आपल्या जवळपास
तांबट घरटे बनवत आहे. काही लोक याला सुतार पक्षीसुद्धा समजतात. पण दोघेही वेगवेगळे
आहेत. मऊ लाकूड असलेल्या झाडाची एखादी
वठलेली फांदी तो हुडकून काढतो. पिपंळ, सावर, गुलमोहर, आंबा,
चिंच वा शेवग्याचे झाड त्याच्या पसंतीला
येते. साधारणपणे जमिनीपासून १०/१२ फुटांवर फांदीच्या खालच्या बाजूची जागा
घरटयासाठी निवडली जाते. नरमादी जोडीने लाकूड पोखरण्याचे काम करतात. जुन्या
घरट्याचा वापर ते करताना आढळतात. किंवा दर वेळी नवीन घरटे जोडीने बनवत असतात.
तांबट पक्षी प्रामुख्याने फळे
खातो.. अंजीर, उंबर, वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात.
तसेच ठरावीक फुलांच्या पाकळ्याही खातो. त्याचबरोबर तांबट पक्षी काही ठरावीक कीटकही
खातो. तांबट आपल्या शरीराच्या दीड ते तीन पट फलाहार करतो असे आढळून येते.
तांबट पक्ष्यांचा विणीचा हंगाम
जानेवारी ते जून असतो. मादी ३ ते ४ पांढरी स्वच्छ अंडी घालते. साधारणतः २ आठवड्यात पिले अंड्यातून बाहेर
येतात. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात.
(२०११ मध्ये तांबट पक्ष्याला
मुंबईचा प्रमुख पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली).
Article and Photo
Dr. Vidhin Kamble
Email. vidhinkamble16@gmail.com
Article and Photo
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
No comments:
Post a Comment