पक्ष्यांचे
जग....
पक्ष्यांचे जग हे इतर
प्राण्यांपेक्षा खूप वेगळे असते. त्यांना पिसे असतात. ते अंडी घालतात व आपल्या
शरीराच्या उष्णतेने उबवतात. पक्षी हे पृष्ठवंशीय असून त्यांना इतर प्राण्यांसारखा
पाठीचा कणा असतो. पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन वर्ग आहेत. १. उष्ण रक्ताचे आणि २.
शीत रक्ताचे प्राणी. उष्ण रक्ताच्या प्राण्यांचे तापमान कायम असते. सभोवतालच्या
वातावरणाचा अशा प्राण्यांच्या शारीरिक
तापमानावर काहीही परिणाम होत नाही. पक्षी हे उष्ण रक्ताचे असतात. ज्या प्राण्यांना
पिसे असतात असे सर्व प्राणी म्हणजे पक्षी होय. पक्षी हे आपल्या पंखाच्या सहाय्याने
हवेत उडतात. घरटी बांधतात. अंडी घालतात. असे असले तरी पक्ष्यांमध्ये खूप मोठी
विविधता दिसून येते. त्यांचे आकार, रंग हे खूप
वेगवेगळे असतात. म्हणूनच पक्ष्यांबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल आणि आकर्षण वाटते.
दोन ग्रॅम वजनाच्या हुमिंग बर्ड पासून अवाढव्य शहामृगापर्यंत वेगळेपण दिसून येते.
भारतात मोरासारखा सुंदर पक्षी आपल्या रंगीबेरंगी पिसारा फुलवून सर्वांना मोहित
करताना आपण अनेकवेळा पाहिले असेल. उडता न येणारा अंटार्क्टिका जवळ पेग्विन पक्षी
असेल, किंवा २ ते २.५ मीटर लांब पंख असलेला गरुड इत्यादी
पक्षी आपले वेगळेपण सिद्ध करीत असतात. पक्ष्यांचे प्रमुख विशिष्ठ असे की ते घरटे
बांधतात. पक्ष्यांच्या अधिवासानुसार झाडांच्या फांदीवर, जमिनीवर,
छतावर किंवा मिळेल त्या ठिकाणी घरटे बांधतात. पक्षीसृष्टीत सुमारे ३९ जातीचे ऐदी पक्षी नेस्ट
पॅरासाआईट आहेत जे कधीच घरटे बांधत नाहीत किंवा कष्ट घेत नाहीत. घरटी करणारे अनेक
पक्षी आपल्या अवतीभवती नेहमीच पहायला मिळतात.
प्रत्येक पक्षी विशिष्ठ प्रकारचे अन्न खात असतो. अगदी मृत जनावरांचे मांस
खाणारे, अळ्या, किडे, धान्य खाणारे, मधावर गुजराण करणारे, असे अनेक प्रकारच्या खाद्य खाण्याच्या सवयी असणारे पक्षी वेगवेगळ्या
परिसंस्थामध्ये आढळतात. त्यांच्या खाद्य पद्धतीमुळेच निसर्गाचा समतोल व निसर्गाची
स्वच्छता राखण्याचे कार्य घडत असते. स्थलांतर करणे हे काही पक्ष्यांचे विशिष्ट
आहे. पण सर्वच पक्षी स्थलांतर करीत नाहीत. तर काही पक्षी आपले सगळे आयुष्य
छोट्याशा जागेत व्यत्तीत करतात. तर काही पक्षी हजारो मैलांचा प्रवास वर्षानुवर्षे
करीत असतात. पक्षी हा घटक परिसंस्था आणि
हवामान यांमधील बदलाचा निर्देशक असतो. पक्ष्यांच्या हालचालीवरून व स्थलांतरा वरून
आपल्याला हवामानातील बदलाचा अंदाज घेता येतो. ‘मोर’, आणि ‘पावश्या’ ह्यांचे
पावसाळ्यापूर्वीचे ओरडणे पाऊस येणार असल्याचा संकेत देणारे असते. पावसाळा संपत
आल्यावर ‘खाटीक’ पक्षी दिसायला लागतात,
तसेच तास किंवा निलकंठ (इंडियन रोलर) नावाचा निळा पक्षी माळरानावर
दिसायला लागतो. असे अनेक पक्षी आपल्याला पावसाच्या आगमनाचा संकेत देत असतात.
पक्ष्यांचे महत्व मानवी जीवनात फार मोठे आहे. मानवाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
मदत करीत असतात. किड नियंत्रण, बिजप्रसार, उपद्रवी जीवांचा नाश, परागीभवन, निसर्गाच्या साफसफाईचे, तसेच पक्ष्यांच्या विष्टेचा
खत म्हणून वापर, इत्यादी कार्य करीत असतात. हिवाळ्यात
युरोपमधून भारतात अनेक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगो अर्थात रोहितपक्षी
सैबेरियातून भारतात दरवर्षी येत असतात. तसेच भोरड्यासुद्धा हजारो किलोमीटरचा
प्रवास करून लाखोंच्या संख्येने भारतात येतात. चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या
दक्षिण भागात स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वांत मोठे स्थलांतर करतो.
तो उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव व परत उत्तर ध्रुव असा जवळ जवळ ३६,००० कि.मी.चा प्रवास एका वर्षात करतो. सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी
स्थलांतर करून भारतात येतात.
आजमितीला पृथ्वीवर
पक्ष्यांच्या जवळपास ८६५० जाती असून भारतातील १२०० पक्ष्यांच्या जाती असून ७५
कुळांचे आणि २० गणांचे प्रतिनिधित्व
करतात. भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची
गोष्ट आहे. आपल्या देशात हवामानाचे व भूप्रदेशांचे वैविध्य आढळून येते. त्यामुळे
जगात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती भारतात आकर्षित होतात. म्हणूनच भारतात
अनेक प्राण्याच्या प्रजातीबरोबरच पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात.
लेखक
प्रा. डॉ. विधिन कांबळे प्राणीशास्त्र विभाग सांगोला महाविद्यालय सांगोला
Dr. Vidhin Kamble
Sangola Collge Sangola
No comments:
Post a Comment